अतिवृष्टीचा अनेकांना फटका : जिल्ह्यात केवळ २६ टक्के रोवणी चंद्रपूर : यावर्षीच्या कमी-अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सुरूवातीला पाऊस न झाल्याने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. तर पेरणी केल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने अनेकांचे पिके उद्धवस्त झालीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असून २६ जुलैअखेर ३३ टक्के सर्वसाधारण क्षेत्र पेरणीविनाच असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे धडाक्यात सुरू केली. कापूस व धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाने सांगितले होते. मात्र अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे पेरण्या थांबल्या होत्या. तर ज्यांनी पेरणी केली होती, त्यांची पिके वाहून गेली तर काहींची पिके बांधात पाणी भरून राहिल्याने सडून गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. सध्या भातीच्या रोवणीची कामे सुरू असून सातापर्यंत २६ टक्के रोवणी झाली आहे. तर सोयाबीन ४६ टक्के व कापूस १४६ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्याच्या एकूण ४ लाख ३८ हजार २०२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत २ लाख ९३ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अनेक शेतकऱ्यांना फटका यापूर्वीच हवामान खात्याच्या अंदाजाला बळी पडत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करुन टाकल्या होत्या. राजुरा, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही तालुक्यात असा प्रकार घडला. मात्र मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या या पेरण्या व्यर्थ गेल्या. मात्र त्यानंतर सतत पाऊस झाल्याने त्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. यात शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. कापसाचा पेरा वाढला यंदा कृषी विभागाने चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे होते. त्यापाठोपाठ कापूस एक लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन एक लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. असे असले तरी यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. यात १४५ टक्के म्हणजे १ लाख ५५ हजार ६११ हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी झाली आहे.
दुबार पेरणीमुळे ३३ टक्के क्षेत्र पेरणीविनाच
By admin | Published: July 29, 2016 12:49 AM