उपरी: सावली तालुक्यात जूनमध्ये झालेल्या अती पावसाने धान पेरणीची कामे खोळंबली होती. ती पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने ९५ टक्के पेरणीची कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने अनेकांची धानाची रोपे सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.या संदर्भाने तालुका कृषी कार्यालय सावली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भात पिकासाठी एकूण २४ हजार ४४० हेक्टर शेतीची नियोजन असून धान पेरणीसाठी २ हजार ४४० हेक्टरवर धानाची पेरणी होते. आतापर्यंत २ हजार ३०१ हेक्टरवर म्हणजे ९५ टक्के धान पेरणीची कामे पूर्णत्वास आली आहेत.सदर धान पेरणी करताना शेतकऱ्यांनी काही जवळची तर काही महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्याने धानाची रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. येत्या दोन- चार दिवसात पाऊस पडला नाही. तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी बांधव, वरुणराजांकडे पाऊस पाडण्यासाठी साकडे घालत आहे. शेतकऱ्यांवर दुबार धान पेरणीची संकट आल्यास, शासनाने शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करुन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 11, 2015 1:44 AM