चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा उशिरा पाऊस आल्याने आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या तर अजुनही ६० लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आली. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्हे भात उत्पादक म्हणून ओळखले जातात. मात्र रोवणीयोग्य पाऊसच नाही. राज्यातील एकूण भात रोवणीचा विचार केल्यास आतापर्यंत १५ टक्केच झाले आहे.
राज्यात यावर्षी जून महिन्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला आहे. चालू महिन्यात देखील १४ जुलै २०२३ पर्यंत ४४ टक्के कमी पाऊस झालेला आहे. या महिन्यात आतापर्यंत ३३० मिलिमीटरऐवजी केवळ २६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत ६३ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांच्या आत, १४५ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या आत, तर ९७ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. केवळ ५० तालुक्यांमध्येच १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात खरिपाचा पेरा १४२ लाख हेक्टरवर होतो. त्यापैकी १०२ लाख हेक्टर गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा झाला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ८३ लाख हेक्टरवर पेरा करता आला आहे.
अशी आहे पीकनिहाय पेरणी स्थिती
राज्यात कपाशी पेरणी ७९ टक्के तर सोयाबीन पेरणी ७६ टक्के झाली. चालू आठवड्यात पाऊस चांगला झाल्यास उर्वरित पेरण्या होतील, असा दावा कृषी विभागाने केला. सोयाबीनचा पेरा ४१.२९ लाख हेक्टरवर होतो. यंदा आतापर्यंत ३१.७४ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ३८ लाख हेक्टरच्या पुढे पेरा गेला होता. कपाशीचा सरासरी पेरा ४२ लाख हेक्टरवर होतो. गतवर्षी ३७ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण केला होता. यंदा ३३.३० लाख हेक्टरवर रखडला आहे. १५ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा गेल्या वर्षी याच कालावधीत ९.११ लाख हेक्टरवर झाला होता. यंदा हाच पेरा ७ लाख हेक्टरवर रखडला आहे.