दीपक साबणे लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पहाडावरील शेतकरीवर्ग शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असून सोबतच रासायनिक खते, कीटकनाशकांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊन जमिनीचा दर्जा घसरत आहे आणि जमीन दिवसेंदिवस बंजर होत आहे.
याचा परिणाम थेट शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनावर होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या वापरामुळे पिकाचा दर्जाही खालावत आहे. म्हणून आता पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
मागील दहा वर्षांपूर्वी माणिकगड पहाडावरील शेतकरी शेती व्यवसायासोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहत होते. पशुपालनात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळत होते व दुग्धव्यवसायही करत होते. पशुपालन करत असल्यामुळे जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व मिळत होते. यामुळे जमिनीचा दर्जा वाढत होता. कोणतीही हानी होत नव्हती. शिवाय शेतकऱ्यांना निरोगी पिकातून पौष्टिक अन्न मिळत होते. तसेच उत्पादन दर्जात वाढ ही होत होती.
खरीप आणि रब्बी हंगामात पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तर शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होते. मात्र, आजघडीला ही पद्धत अपवादात्मक शेतकरी अवलंबत आहेत. आजघडीला परिस्थिती बदलली आहे. पिकाचे उत्पादन चांगले व्हावे व पीक चांगले राहावे म्हणून रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर होत असल्याने परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्व नष्ट होत चालले आहेत. शेतीतून मिळणाऱ्या अन्नातही पोषण तत्त्वांचे प्रमाण अतिशय कमी दिसून येते. सध्या पिकांना रासायनिक खत व कीटकनाशके यांचा सर्रास वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वेळीच भविष्याचा होणारा धोका ओळखून सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर फक्त उत्पादनवाढ डोळ्ळ्यासमोर ठेवून शेतकरी रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर करत आहेत. परिणामी जमिनीतील पोषक तत्त्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळले नाहीत तर शेती फक्त नावापुरतीच शिल्लक राहील.