लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. परंतु, जंगल परिसरात येणाऱ्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये हिंस्र पशूंकडून मानवावर हल्ले करण्याच्या घटना सतत वाढत आहेत.वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनस्तरावरून केले जात आहे. मात्र वन्यप्राण्यांचे हल्ले कमी झाले नाहीत. यात अनेकांचे बळी गेले आहेत. रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनाही कमी नाहीत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे वाघांचे माहेरघर समजले जाते. तेथील वाघांचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशी पर्यटक आतूर असतात. त्यांच्या दर्शनाशिवाय ताडोब्याची सफर पूर्णत्वास येत नाही. ताडोबा परिसरातील वाघ आता गावालगतच्या वनपरिक्षेत्रात संचार करीत आहेत. वाघ व अन्य हिंस्र पशू मनुष्यप्राण्यांच्या जिवावर उठत असल्याने गावकरी दहशतीत आहेत. गाव परिसर असो अथवा शेत शिवार वाघाच्या अस्तित्वामुळे मानवाच्या जीवाची जोखीम निर्माण झाली आहे. शेतीच्या हंगामावेळी वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड होत चालले आहे. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत. पण, वनव्याप्त परिसरातील शेती करताना पावलोपावली धोका पत्करावा लागत आहे.वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते. ही मदत अत्यावश्यक असली तरी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात बिबट्या, वाघ व इतर वन्यप्राण्यांनी धूडगूस घातला आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवासह जनावरांचा फडशा पडत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षावर ठोस उपाययोजना केल्यास हा संघर्ष संपष्टात येऊ शकतो. त्याकरिता वनव्यवस्थापनात लोकसहभाग वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:22 AM
जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे.
ठळक मुद्देमानव व वन्यजीव संघर्ष : प्रभावी उपाययोजनेची गरज