भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा- भद्रावतीच्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसापासून कासवगतीने चालू असून मोठ्या प्रमाणात वळण रस्त्याचे खोदकाम केल्याने हा परिसर अपघाताला आमंत्रण देत आहे.
भद्रावती येथून चंदनखेडामार्गे ताडोबा, शेगाव, चिमूर येथे जाणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ सुरु असते. महामंडळाच्या बसेस, तसेच गावानजिक येणारी जाणारी मोठमोठी वाहने या रस्त्यानी जा- ये करतात. याच मार्गात मुरूमाने भरलेले ओव्हरलोड ट्रक, ट्रॅक्टर, काळी पिवळी थांबतात. बसस्थानक असल्याने त्याच्या सभोवताल भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आणि छोटे मोठे हॉटेल, किराणा व्यावसायिकांची दुकानेसुद्धा आहे. बसस्थानक लगत एक मस्जिदसुद्धा आहे. चंदनखेडा या गावाला जाणाऱ्या बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावर लांब वळण असून रस्त्यालगत कंत्राटी पध्दतीने ३ ते ४ फुटाचे खोदकाम केले आहे, मात्र २ ते ३ महिन्यांपासून या मुख्य रस्त्याच्या लांब वळणावर मुरुम भरण्याचे कामावर दुर्लक्ष केल्या जात असल्याने हे लांबच लांब वळण अपघातासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पथदिवे नसल्याने खोदलेले वळण दिसून येत नाही. एकाच वेळी या वळणावर दोन वाहने आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.