लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राला सातत्याने आधार देणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीला सर्मपित असे तीन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य व सांस्कृतिक महोत्सव २०२० चे आयोजन स्थानिक शांताराम पोटदुखे साहित्य नगरी (चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर) येथे शुक्रवारपासून आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडी व पर्यावरण दिंडीने करण्यात आली. अनेक साहित्यिकांसह चंद्रपुरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी या दिंडीत विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या दिंडीने चंद्रूपर नगरी दुमदुमली.शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, पातळ घालून लेझीम खेळणाऱ्या मुली, ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी हे या ग्रंथ दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. स्थानिक आझाद बगिचाच्या कस्तुरबा मार्गावरील प्रवेशद्वारातून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली ही ग्रंथ दिंडी गिरणार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक मार्गे संमेलनस्थळी पोहचली.साहित्य व सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता सुभाष, विदर्भ साहित्य संघाचे नरेश सबजीवाले, वसंता वाहोकर, मानेकर, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, प्रा. श्याम हेडाऊ आदींनी ग्रंथ दिंडीचे पूजन करुन ग्रंथ दिंडीची सुरुवात केली.मार्गावरील महानगरपालिके समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करीत ही दिंडी मार्गक्रमण करीत होती.शेकडो विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त अशा ग्रंथ व वृक्ष दिंडीने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली. साहित्य सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाची ही एक नांदीच ठरली. या ग्रंथदिंडीचे विविध जात, धर्म, पंथीय नागरिकांनी आणि सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी विविध ठिकाणी पाणी, शरबत देऊन स्वागत केले. कार्याध्यक्ष डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित हे या दिंडीला सातत्याने मार्गदर्शन करीत होते.
संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने दुमदुमली चंद्रपूर नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, पातळ घालून लेझीम खेळणाऱ्या मुली, ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी हे या ग्रंथ दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. स्थानिक आझाद बगिचाच्या कस्तुरबा मार्गावरील प्रवेशद्वारातून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली ही ग्रंथ दिंडी गिरणार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक मार्गे संमेलनस्थळी पोहचली.
ठळक मुद्देदिंडीतून दिले विविध संदेश : चंद्रपुरात राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सव