प्रदूषणाचा विळखा : चोरीकडे पोलिसांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उद्योगांमधून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थ व पाण्यामुळे प्रदूषण होत आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेगडीमध्ये जाळला जाणारा कोळसा प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे नागपूर येथील निरी व आयआयटी पवईने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. चंद्रपूर आणि ग्रामीण भागात दररोज अंदाजे सहा टन कोळसा जाळला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळशाचा धूर शहरांमध्ये प्रदूषण निर्माण करते. या कोळशाची राखदेखील आरोग्यसाठी हानीकारक आहे. वेकोलितील कोळशाची मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते. या चोरीकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आयुर्मान कमी होत चालले आहे. चंद्रपूर आणि आसपासच्या गावांमध्ये वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्या खाणीचा कोळसा नागरिकांना किरकोळ विकला जात नाही. तसेच या कोळशाची किरकोळ विक्री करण्याची परवानगी नाही. तरीही नागरिकांना स्वयंपाक करण्यासाठी पेटविल्या जाणाऱ्या शेगडीसाठी कोळसा मिळत असतो. हा विषय जिल्हा पर्यावरण संतुलन समितीच्या २ डिसेंबर २०१६ रोजीच्या बैठकीत ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे व ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मांडला. त्यावर जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मोफत गॅस वाटप किंवा पर्यावरणपूरक शेगड्यांचे वाटप करण्यासाठी स्थानिक समाजकार्य महाविद्यालयाकडून सर्वेक्षण करण्याची सूचना केली. तसेच महानगरपालिका, ईको-प्रो संस्थेमार्फत पुढील कार्यवाही करण्यास सांगितले. त्यावर मनपाने एक महिन्यात कार्यवाही करण्यास मुदत मागितली. या बैठकीचा अहवाल ९ मार्च रोजी तयार करण्यात आला. त्यामुळे बैठकीतील सूचनांवर कार्यवाही करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. गेल्या सहा महिन्यांत घरगुती कोळसा जाळण्यावर सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. निरीने केलेल्या अभ्यासामध्ये शेगडीमध्ये जाळला जाणारा कोळशाचा विषय गंभीर असल्याचे नोंदविले आहे. कोळसा जाळल्याने होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी आयआयटी पवईला उपाययोजना सूचविण्यास सांगितले होते. प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेल्या कृती अहवालात कोळसा जाळणे प्रदूषणाचा मुख्य घटक असल्याचे म्हटले आहे.आरोग्य विभागाचा प्रदूषण अहवालजिल्हा आरोग्य विभागाकडून दुर्गापूर, घुग्घुस व ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत प्रदूषण अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये श्वसनाचे आजार, डोळ्याचे आजार व त्वचेचे आजार असलेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चंद्रूपरजवळ असलेल्या दुर्गापूर आरोग्य केंद्रामध्ये १७८ दमा रुग्ण, ३१४ ब्रांकॉयटिस, २१९० ए.आर.यू., २३ टी. बी.असे ३ हजार ४७६ रुग्ण श्वसनाचे आजार असलेले आढळून आले होते. घुग्घुसमध्ये तब्बल ७ हजार ८४५ आणि ताडाळी येथे १ हजार ६६८ श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आढळून आले.२००५ मध्ये आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात चंद्रूपर, दुर्गापूूर, घुग्घुस, बल्लारपूर, राजुरा परिसरात श्वसान आजाराचे ५० टक्के रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात झाले नाही. आता पंडित दीनदयाल आरोग्य योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. त्यातही श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.मनपा व जि. प.ने लक्ष द्यावेकोळसा चोरी पकडण्यासाठी मनपा आणि जिल्हा परिषदेने पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. शहरातील अवैध कोळसा डेपो बंद केले पाहिजे. कोळसा जाळणाऱ्या नागरिकांना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत जोेडणी देण्यात यावी. रॉकेलही उपलब्ध करणे शक्य आहे. प्रदूषण मंडळाने या बाबीचा विचार करणे गरजेचे आहे.प्रदूषणामुळेच आजार होतात, असे वैद्यकीय निदान करणे शक्य नाही. परंतु कोळसा जाळणे, वाहनातून निघणारा धूर, कोळशाची राख हे घटक आजारासाठी कारणीभूत ठरत आहेत. खोकला, दमा, ब्रांकायटिस आदी विविध आजार होत असतात. प्रदूषणामुळे नागरिकांचे जीवनमान कमी होते. त्याकरिता सर्व यंत्रणांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक आहे. -डॉ. एम. पी. मुरंबीकर, शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.
कोळशाच्या शेगडीचा धूरही जाळतो फुफ्फुस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 12:38 AM