नागरिक त्रस्त : बांधकाम विभागाने लक्ष द्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिमूर ते पेडगाव रस्त्याचे काम सुरू असून, दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. रस्त्याचे काम अजूनही होणे बाकी असले तरीही काही भागांमध्ये काम अपूर्णच आहे. त्यातच बामणी चौक ते बामणी मालपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्यावर एका बाजूला फक्त गिट्टी टाकली असून, दुसऱ्या बाजूला मातीचे व मुरमाचे काम झाले आहे. त्यामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे.
रस्त्यावरील मुरमामुळे रहदारीला, नागरिकांना त्रास होत आहे. मुरमावर बाजूची गिट्टी येत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यातच बामणी माल गावात मुरूम रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. बामणी चौक ते बामणी माल व बामणी रेट या गावांना रोजच धुळीचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्यावर पाणी टाकणे बंद केल्यामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे.
वासेरा बसस्टॉप चौकात रस्त्याचे खोदकाम करून माती व मुरूम माती पिचाई केलेली आहे. त्यामुळे चौकातही धुळीचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी. मागील दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. तीनही गावांच्या समस्या जाणून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर पाणी टाकून धुळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कोट
चिमूर - पेडगाव रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून, बामणी चौक ते बामणे रेट हा दीड किलोमीटरचा रस्ता धुळीने बरबटला आहे. रस्ता अपूर्ण असून, एका बाजूला गिट्टी टाकलेली आहे तर दुसर्या बाजूला फक्त मुरूम आणि माती टाकलेली आहे. त्यामुळे रहदारीला त्रास होत आहे. बामणी माल गावात रोजच धूळ येत आहे.
- संजय दोडके,
ग्रामस्थ, बामणी माल