नितीन मुसळे/प्रकाश काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमच्या कोळसा खाणीत अजिबात धुळप्रदूषण होत नाही, असा उरफाटा जावईशोध वेकोलि अधिकाऱ्यांनी लावल्याने आता वेकोलि अधिकाऱ्यांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा भूलथापा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी -०२, गोवरी डीप या वेकोलिच्या कोळसा खाणीत वेकोलिकडून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहे. वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ थातुरमातूर पाणी मारण्याचे काम केले जात आहे. कोळसा खाणीत धूळ प्रदूषण होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी वेकोलिने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत गोवरी डीप कोळसा खाणींचे मॅनेजर प्रसाद यांना विचारणा केली असता, आमच्या कोळसा खाणीत अजिबात धुळ प्रदूषण होत नाही असा दावा त्यांनी केला आहे. केवळ फलक लावून कोळसा खाणीत अजिबात धुळ नसल्याचा गाजावाजा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात वरिष्ठांनी कोळसा खाणींची पाहणी केली तर कोळसा खाणीतील सत्य बाहेर येईल.
पर्यावरण विभागाचा देखावाच
कोणत्याही कोळसा खाणीत पर्यावरणाला धोका पोहचणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी वेकोलित पर्यावरणाचा समतोल साधता यावा. धुळ प्रदूषण करू नये. असे मोठे फलक रस्त्यालगत दिमाखात उभे आहे. परंतु पर्यावरणाच्या नियमांची वेकोली प्रशासनाकडून पायमल्ली करण्यात येत असल्याने. पर्यावरण फलक केवळ देखावा म्हणून उभे आहे.