गडचांदूर ते कोरपना हा प्रमुख राज्य महामार्ग उखडलेला आहे. रोजच किरकोळ अपघात होतात. गडचांदूर ते नांदा फाटा हा ७ किमीच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. जड वाहतुक सतत सुरू असते. रस्त्याची कितीही डागडूजी केली तरी जैसे थे अवस्था होते. भोयगाव ते गडचांदूर, भोयगाव ते गाडेगाव विरुर, नारांडा हा मार्ग रस्त्यावरील धुळीने ग्रासला आहे. रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावर लाल माती टाकली असल्याने व जळवाहतुक होत असल्यामुळे रस्ता पुर्णत धूळमय झाला आहे. नाईलाजास्तव नागरिकांना चंद्रपूरसाठी या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.
पिकांवर धुळीचा प्रादूर्भाव
रस्त्यालागत असलेल्या शेतपिकांची हानी होत आहे. दरवर्षी रस्त्याची दुरवस्था होत असल्याने रस्त्यालगतच्या शेतीत उभ्या पिकावर धूळ बसलेली असते. कापूस काळवंडला तर तुरीचा बार लाल, काळा झालेला दिसतो. परिणामी पिकात घट होत आहे. जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. शासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
रस्त्याला जडवाहतुकीचा फटका
तालुक्यात सिमेंट कारखाने असल्याने नेहमी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. हा मार्ग जड वाहतूक धारकांना सोपा असल्याने ओव्हरलोड वाहतुक, कॅप्सूल ट्रक चालतात. दरवर्षी डागडुजी करूनही आठवड्यात दैनावस्था झालेली असते.
वाढता डोळ्याचा त्रास..
रस्त्यावर असलेल्या धुळीचे कण डोळ्यात जातात. रस्त्यावर उडत असलेल्या गिट्टीचे तुकडेसुद्धा डोळ्याला लगतात. प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये डोळ्याचे आजार बळावले आहे.