लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ८२७ पैकी ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्रामसॉफ्ट’ प्रणाली इन्स्टाल करण्यात आली असून लवकरच दफ्तरविरहित कामकाज सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या नव्या प्रणालीची अनेक गावांमध्ये नुकतीच यशस्वी चाचणी पार पडली. उर्वरित काम पूर्ण झाल्यास मे महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३० प्रकारची विविध प्रमाणपत्रे नागरिकांना अल्प शुल्कात प्राप्त होणार आहेत.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार ‘पेपरलेस’ व्हावा, यासाठी ग्रामविकास विभागाने ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली विकसित केली. या प्रणालीद्वारे हस्तलिखित कामकाजाला पूर्णत: फाटा दिला जाणार असून विविध प्रकारचे प्रमाणपत्र नागरिकांना सहजपणे प्राप्त होणार आहे. सध्या आॅफलाईन पद्धतीने ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत. ग्रामपंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत थेट संवाद राहावा. शिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. काही ग्रामपंचायतींमध्ये मूलभूतर् सुविधा नाहीत. मुख्य म्हणजे २४ तास वीज उपलब्ध नसल्याने ही प्रणाली कुचकामी ठरणार, अशी टीका लोकप्रतिनिधींनी केली होती. वीज व तांत्रिकी कर्मचाºयांची शासनाने व्यवस्था न करता ही आधुनिक प्रणाली ग्रामविकास विभागाच्या वतीने लादल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये नाराज झाले होते. मात्र जिल्हा परिषदच्या पंचायत विभागाने यासंदर्भात गावागावांत सातत्याने बैठका घेऊन ई- ग्रामसॉफ्ट प्रणालीचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्यामुळे ८२७ ग्रामपंचायतींनी ही प्रणाली सुरू करण्यासाठी होकार दर्शविला. यासंदर्भात ठराव पारित करून जिल्हा परिषद पंचायत विभागाला सादर करण्यात आले. परिणामी, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चे आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन स्वबळावर काही उपाययोजनाही केल्या. यातून ई-प्रणाली जलद गतीने इन्स्टॉल करण्याचा मार्ग मोकळा होत आहे. ९० टक्के ग्रामपंचायतीमध्ये काम पूर्ण झाले. अंतिम तपासणी होताच ग्रामपंचायतच्या सहकार्याने आॅफलाईन कामकाज बंद केले जाणार आहे. कोरपना, जिवती, राजुरा, गोंडपिपरी, मूल, सावली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली अद्याप इन्स्टाल झाली नाही. परंतु, ग्रामपंचायतींनी सहमती दिली आहे. तांत्रिक विभागाच्या सल्ल्यानुसार ही कामे लवकरच होणार असून ३३ प्रकारची महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रे नागरिकांना अत्यल्प शुल्कात प्राप्त करता येणार आहे.वीज देयकांचा घोळ संपवाअनेक ग्रामपंचायतींचे वीज बिल थकित असल्याने वीज बिल कंपनीने नोटीस बजावली. तुर्त कारवाई बंद आहे. मात्र, संकट केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू करताना वीज बिलाचा प्रश्नही सोडविणे गरजेचे आहे. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरा, असा आदेश जिल्हा परिषदेने दिला. परंतु, काही ग्रामपंचायतींचा या आदेशाला विरोध आहे.ई- ग्रामसॉफ्ट प्रणालीचे फायदेग्रामपंचायतमध्ये ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू झाल्यानंतर आॅफलाईन कारभार बंद करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना नाममात्र शुल्क देऊन विविध प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करता येऊ शकते. मालमत्ता कर आकारणी, रहिवाशी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, शौचालय बांधकामासाठी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र बांधकामासाठी अनुमती, जन्म- मृत्यूची नोंद, शासकीय योजनांचा लाभ, अनुभवाचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, नोकरी व व्यवसायासाठी नाहरकत, वय, कुटुंब, नळ जोडणी, बेरोजगारीचे प्रमाणपत्र, मालमत्ता व जमीन फेरफारसंदर्भातील प्रमाणपत्रासाठी शुल्क भरुन ही सेवा प्रत्येक नागरिकाला प्राप्त करता येते. प्रणाली सुरू झाल्यानंतर शंभर टक्के कामकाज पेपरलेस पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला नकार देणाºया ग्रामपंचायतीनी आता जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला सहकार्य करीत आहे.ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांना आधुनिक ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीचे महत्त्व विविध कार्यशाळेतून पटवून देण्यात आले. त्यामुळे ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले. शिवाय, तांत्रिक अडचणी दूर केली जात आहेत. जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीमध्ये सुसंवाद वाढविण्यासाठी या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.- ओमप्रकाश यादव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प. चंद्रपूर
ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:33 AM
जिल्ह्यातील ८२७ पैकी ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्रामसॉफ्ट’ प्रणाली इन्स्टाल करण्यात आली असून लवकरच दफ्तरविरहित कामकाज सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
ठळक मुद्दे‘पेपरलेस’ कडे वाटचाल : इन्स्टॉलचे काम अंतिम टप्प्यात