लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने सीमाबंदी करण्याचा निर्णय घेतला. ई पास असेल तरच जिल्हा ओलांडून जाण्याचे आदेश दिले. मात्र, पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याने कुणीही यावे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सीमेत शिरून परत जावे, असे चित्र सोमवारी रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले.
राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर २२ एप्रिल रात्री८ वाजतापासून १ मेपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले. बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आवश्यक कामासाठी खासगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. आदेशात नमूद केल्याप्रमाणे गृह विलगीकरणातही राहावे लागणार आहे. परंतु, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, तेलंगणा सीमेवार आज उलट चित्र दिसून आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने अन्य जिल्ह्यातून वाहनाद्वारे नागरिकांची ये-जा सुरू होती.
विनाकारण फिरण्यात तरूणाई पुढे
आंतरजिल्हा प्रवासासाठी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणांसाठीच इ पास दिला जातो. मात्र, आज चार सीमांना भेट देऊन पाहणी केली असता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली. यामध्ये युवक संख्येने अधिक दिसून आले. पोलिसांच्या दुर्लक्षाचा युवक गैरफायदा घेत आहेत.
ई पास कसा काढावा हेही माहिती नाही?
पोलीस प्रशासनाने ई-पास काढण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केले. त्यासाठी कोणतेही कागदपत्रे लागतात, याचीही माहिती दिली. पण, ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाही. यासाठी प्रशासनाने प्रयत्न न केल्याने ई- पास लागतो, माहितीच मिळाली नसल्याचा आरोप काही वाहनधारकांनी केला.