उदय गडकरी
सावली : १५ ऑगस्टला सावली तालुका तिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र आजही हा तालुका विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच आहे. विकासाचे ग्रहण कधी सुटणार, हा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे.
२० वर्षांच्या अथक संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९९२ ला तालुक्याची निर्मिती झाली. स्व. वामनराव गड्डमवार यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांनी तालुका निर्मितीची घोषणा केली. त्यासाठी पत्रव्यवहार आणि तालुका निर्मितीसाठी युवकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व. नी. ज. गडकरी यांनी पार पाडली. त्यांच्याच २० वर्षांच्या अथक संघर्षाचे फलित म्हणून सावली तालुका उदयास आला. तालुका झाला, पण विकासाचे काय? हा अनुत्तरितच असणारा प्रश्न. तालुका निर्मितीपासून सुमारे २० वर्षेपर्यंत या तालुक्याला दोन आमदार व दोन खासदार लाभले. परंतु त्यांना या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता आला नाही. ही सल सावलीकरांच्या मनात कायम आहे.
या तालुक्यासाठी मंजूर झालेली अनेक शासकीय कार्यालये सुरुवातीच्या २० वर्षांत इतरत्र पळविण्यात आली. क्रीडांगण, आठवडी बाजार, शासकीय इमारती, रोजगार निर्मिती, अशा अनेक बाबींची या तालुक्याला वानवा आहे. हे विकासाचे ग्रहण सोडविण्यासाठी कुणी पुढे धजावेल का?
बॉक्स
इंग्रज राजवटीत आसोलामेंढाची निर्मिती
२००९ ला परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून नवीन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आणले. त्यातही सावलीकरांवर अन्याय करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी गाव म्हणून १९५२ मध्ये सावली गावाला विधानसभा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. शिवाय इंग्रज राजवटीत १८९१ सालात जिल्ह्यातील सर्वांत मोठा असलेल्या आसोला मेंढा तलावाच्या निर्मितीसोबतच सावली येथे निरीक्षण गृह व कार्यालयाची स्थापना केली. या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या जोरावर सावली तालुक्याचा कायापालट होणे अपेक्षित होते. २० वर्षांतील तालुका निर्मितीच्या संघर्षानंतरही ३० वर्षांपासून विकासासाठी संघर्षच करावा लागेल काय, हा प्रश्न आपसूकच उभा ठाकतो.