मजुरांचेही शोषण : वनविकास महामंडळातील प्रकारकोठारी : मध्यचांदा वनविकास महामंडळातील झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात प्रचंड वृक्षतोड झाली आहे. सन १३-१४ या वर्षात मोठय़ा प्रमाणात विविध क्षेत्रीय कामात गैरप्रकार करण्यात येत आहे. महामंडळात आतापर्यंत झालेल्या विविध कामाची तसेच अवैध वृक्षतोडीची चौकशी करणे आता गरजेचे झाले आहे. झरण वनपरिक्षेत्रात ८७५९.00३ हेक्टर जंगल क्षेत्र असून त्यात १0 बिट व पाच राऊंड आहेत. कन्हारगाव क्षेत्रात ९६९१.८२४ हेक्टर जंगल क्षेत्र असून त्यात १0 बिट व पाच राऊंड आहेत, तोहगाव वनक्षेत्रात ७ बिट व तीन राऊंड आहेत. त्यात ६५८९.0९१ हेक्टर जंगल आहे तर धाबा वनक्षेत्रात ६ बिट व तीन राऊंड असून ६१७४.६९४ हेक्टर जंगल आहे. महामंडळाच्या ३१२१४.६३२ हेक्टर जंगलात सागवान वृक्षासह अनेक प्रजातीचे मौल्यवान इमारती वृक्ष आहेत. या जंगलात वाघ, बिबट आदी प्राण्यांसह इतर वन्यप्राण्यांची संख्या भरपूर आहे. महाराष्ट्र शासनाने जंगलाचा विकास संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कोठारी, धाबा वनक्षेत्रातील ८0 टक्के जंगल महामंडळाच्या स्वाधिन केले. यात महामंडळाने २0-२२ हजार हेक्टर जंगलात रोपवन करुन करोडो रुपये खर्च केले आहे. मात्र सध्या वनप्रकल्पातील जंगलाला अवैध वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. जंगल शेजारी गावातील चोरटे जंगलात बिनदिक्कतपणे कधीही प्रवेश करून मौल्यवान सागवानसह अनेक वृक्षांच्या कत्तली करीत आहेत. एकूण ३३ बिटातून १0-१५ बिटात अवैध वृक्षतोड प्रचंड झाली आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी कुठलेही प्रयत्न आजवर केले नाहीत. वनसंरक्षणाकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. अवैध वृक्षतोड व चोरट्या वाहतुकीवर प्रतिबंध करण्याकरिता फिरते पथकाची निर्मिती असून त्यात एक आरएफओ व दोन कर्मचारी आहेत. त्यांना वाहनाची उलपलब्धता नाही. त्यामुळे ते केवळ घरी बसून जंगलाचे संरक्षण करतात. एकंदरीत वनविकास महामंडळ जंगल संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. अवैध वृक्षतोडीची चौकशी वनविकास महामंडळाच्या अधिकार्या व्यतिरिक्त इतर अधिकार्यांकडून केल्यास त्यातील सत्य समोर येईल. सन २0१२ ते २0१४ या आर्थिक वर्षात रोपवन तयार करण्याच्या नावावर अवैध कामे, गैरप्रकार अधिकार्यांच्या संमतीने केले जातात. रोपवन विरळण करणे, बिट, इमारती लाकूड कटाई करणे, वाहतूक करणे, जंगल डेपो तयार करणे, जंगल ते जंगल डेपो व जंगल डेपो ते विक्री डेपोपर्यंत रस्ता तयार करणे, वाहतूक करणे, रोपवनाची स्वच्छता करणे, जंगलात जाळरेषा तयार करणे, जलाई करणे, लांब बांबू, बांबु बंडल कटाई करणे आदी विविध कामे मजुराकडून केले जातात. यात शासनाने ठरविलेला मजुरांचा दर अधिकारी कधीही देत नाहीत. आपल्या मर्जीतील मजुरांना कामावर घेऊन इतरांना डावलण्यात येते. योग्य मजुरीची मागणी करणार्या मजुरांना कामावर कधीही घेतले जात नाही. वाहतुकदाराकडून योग्य कमीशनद्वारे कामे केली जातात. विक्री डेपोवर काम योग्य होत नाही. विक्री डेपोवर अनेक गैरप्रकार होत असतात. तसेच झरण येथे महामंडळाची रोपे तयार करण्याची नर्सरी आहे. या रोपवाटिकेत दररोज शेकडो मजूर काम करीत असतात. त्यात हजेरी बुकावर अनेक बनावट मजुरांचे नाव भरली जातात. सही- अंगठे बनावट मांडून लाखो रुपयांची उचल करण्यात येते. महामंडळाच्या विविध कामासाठी बनावट बिल तयार करण्यात येतात. बनावट व्हावचर तयार करण्यात येतात. वरिष्ठांचेही याकडे लक्ष नाही, हे विशेष. (वार्ताहर)
जंगलाला वृक्षतोडीचे ग्रहण
By admin | Published: June 05, 2014 11:53 PM