जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प हा शेती सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारा प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्ष होत आहे.सदर सिंचन प्रकल्प माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी व कोरपना - जिवती तालुक्याच्या अगदी सिमारेषेला लागलेला आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाला १९८० च्या दशकात तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री कमलनाथ यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. १९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेती सिंचन कालव्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर बऱ्याच ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या कारणाने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रस्तावित प्रकल्पानूसार ११.०७ दलघमी जल संचयन अपेक्षित असताना. प्रकल्प निर्मितीदरम्यान पूर्णता खोलीकरण व सपाटीकरण आदी कामे करण्यात न आल्याने प्रत्यक्षात ७ दलघमी जलसंचय होत असल्याची माहिती आहे. यामधून ३.०३ वाणिज्य वापराकरिता अंबूजा सिमेंट , ०.५३ सोनूर्ली पाणीपुरवठा योजना यांना आरक्षित आहे. २९६८ हेक्टर शेती क्षेत्रावर जलसिंचन अपेक्षित असताना हजार हेक्टरच्या वर शेती सिंचन होत नाही.कारगाव, पिपरडा, कुसळ, धानोली, वनसडी, दहेगाव रिठ, चिंचखोड रिठ , खैरगाव रिठ , सोनूर्ली, चिंचोली, बेलगाव, वडगाव , खिरडी, पाकडहीरा, इंजापूर , लोणी आदी गावाजवळील शेती सिंचन कालवे बुजले गेले असल्याने मोजक्याच शेतांना याचा फायदा होतो. त्यामुळे सिंचन कालव्याची दुरुस्ती , नवीन कालव्याची निर्मिती, तलाव खोलीकरण, सपाटीकरण, वेस्टवेअर दुरुस्ती, प्रकल्प उंची वाढविणे आदी आवश्यक आहे. तसेच प्रकल्प स्थानी प्रकल्पाच्या माहिती संदर्भात माहिती फलक ही लावणे लोक माहितीच्या दृष्टीने गरजेचे आहे.
प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूरला पकडीगुड्डम मध्यम सिंचन प्रकल्पाचे शाखा कार्यालय वनसडी किंवा कोरपना येथे असणे अपेक्षित असताना गडचांदूर येथे आहे. त्यामुळे अमलनाला व पकडीगुड्डम दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच ठिकाणाहून पाहिले जाते. परिणामी प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पाचा कारभार सांभाळणे हे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे होते आहे. या कारणाने हे कार्यालय रिक्त पदे भरून कोरपना येथे सनियंत्रणासाठी हलवण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सदनिकांची होतेय दुर्दशापकडीगुड्डम सिंचन प्रकल्पासाठी सोनुली येथे सदनिका बांधण्यात आल्या. मात्र प्रकल्प निर्मितीपासून या सदनिकांत कुठलाही कर्मचारी वास्तव्यास न आल्याने दुरवस्थेकडे वाटचाल करत आहे. इमारतींची बरीच नासधुस झाली आहे. या सदनिका इतर विभागांच्या कामासाठी किंवा गरजूंना देऊन उपयोगात आणाव्यात, अशी मागणी होत आहे.
पर्यटनदृष्ट्याही उपेक्षाच पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त आहे; मात्र या स्थानी पर्यटनविषयक कुठल्याही सोयी-सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. यास्थानी बागबगीचा तयार करून बोटिंग आदी पर्यटन सुविधा करावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.