सिंदेवाही : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला जादुटोणा, भूत-भानामतीचे ग्रहण लागताना दिसत आहे. जादुटोण्याच्या संशयावरून जिवती तालुक्यातील सात लोकांना चौकात बांधून मारहाण झाली. नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे वयोवृद्ध आई आणि तिच्या मुलाला पाण्याचा टाकीच्या लोखंडी खांबाला बांधून मारहाण केली आणि आता चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्डात जादुटोण्याच्या संशयावरून मारहाण झाली. या घटना जिल्ह्याकरिता लांच्छनास्पद आहेत.
तीनही घटनांमध्ये पोलिसांनी जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. परंतु दिवसाढवळ्या गावकऱ्यांसमोर मारहाण होत असताना गावकरी बघ्याची भूमिका घेतात. एरवी नवरा-बायकोच्या भांडणात नाक खुपसणारे गावकरी जादुटोण्याच्या भीतीपोटी मुकदर्शक बनतात. गावकऱ्यांच्या मनात असलेल्या जादुटोण्याच्या भीतीमुळे पीडित कुटुंबाची मदत करीत नाही. त्यासाठी गावागावात अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम राबविणे गरजेचे आहे. तसेच जादुटोणाविरोधी कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. तरच चंद्रपूर जिल्ह्यातील अंधश्रद्धेचे ग्रहण सुटू शकेल, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले.