लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भातील वनव्याप्त भागातील शेतपिकाचे संरक्षण व व्याघ्र संर्वधनाच्या दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्त्वावर राबविण्याच्या मागणीकरिता इको-प्रो संस्थेच्यावतीने बुधवारी चंद्रपूर मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन केले.शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून रानडुक्कर, रोही या वन्यप्राण्यांमुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतपिकाच्या संरक्षणासाठी तारांच्या कुंपणात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात. यात वाघ, डुकर, अशा अनेक वन्यप्राण्यांचा बळी गेला असून शेतकºयांनीही जीव गमवला आहे. हे नुकसान टाळण्यासाठी विदर्भातील वनालगतच्या शिवारातील शेतकºयांसाठी अनुदानावर मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपण योजना राबविणे फायद्याचे ठरणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र व्यक्तिगत पातळीवर सौर उर्जा कुंपण अनुदान योजना प्रादेशिक वनक्षेत्रातील गावांना सुद्धा लागू करावी, व्याघ्र संवेदनशील क्षेत्रात शेतपिक नुकसान व पशुधन नुकसान भरपाई आठ दिवसांच्या आत देण्यात यावी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती, संरक्षीत क्षेत्र, जिल्ह्यातील वाढती वाघाची संख्या यातून उद्भवणारी वाघाची झुंज, वाघ-मानव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने भविष्यकालीन उपाय योजना करावी, गडचिरोली जिल्ह्यात वाघ-वन्यप्राणी अधिवास विकास करण्याच्या दृष्टीने मास्टर प्लान तयार करावा आदी मागण्या बैठा सत्याग्रह आंदोलनातून करण्यात आल्या.आंदोलन दरम्यान इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी राम धोतरे, पर्यावरणवादी प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, नितीन बुरडकर आदी उपस्थित होते.आंदोलनात धर्मेद्र लुनावत, नितीन रामटेके, अनिल अडगुरवार, बिमल शहा, निखिल तांबेकर, जितेंद्र वाल्के, राजू कहिलकर, रमेश मुलकलवार, विश्वजीत इंगलवार, शशांक मुंजनकर यांच्यासह इको-प्रोचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
सौर कुंपण योजनेसाठी इको-प्रोचा बैठा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:32 AM
विदर्भातील वनव्याप्त भागातील शेतपिकाचे संरक्षण व व्याघ्र संर्वधनाच्या दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्त्वावर राबविण्याच्या मागणीकरिता इको-प्रो संस्थेच्यावतीने बुधवारी चंद्रपूर मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन केले.
ठळक मुद्देचंद्रपुरात आंदोलन : मुख्य वनसंरक्षकांना निवेदन