चंद्रपूर : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटनांकडून या दिवशी वृक्षारोपण केले जाते. मात्र येथील आदर्श सोसायटीत पर्यावरण दिवशी चक्क वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होत असली तरी जल, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांचे जिल्ह्यात रोपण होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तर यावर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकजण या दिवशी वृक्षारोपण करून सामाजिक दायित्वाचा परिचय देतात. मात्र आज सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना बापटनगरातील आदर्श सोसायटीमधील एका गृहस्थाने केवळ झाडाच्या फांद्या त्यांच्या अंगणात येतात म्हणून झाडांची कत्तल करून टाकली. त्यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीपलिकडे २२ वर्षांचे एक लिंबाचे झाड आणि एक बदामाचे झाड आहे. आज सकाळी त्यांनी झाडाला दोर बांधून झाडाची कत्तल करणे सुरू केले. परिसरातील नागरिकांना एवढे जुने आणि चांगले वृक्ष कापताना पाहून बरे वाटले नाही. त्यांनी संबंधित गृहस्थाला याबाबत विचारणा केली असता झाडाच्या फांद्या त्यांच्या अंगणात येतात, असे कारण त्या गृहस्थांकडून सांगण्यात आले. दोन्ही झाडे अगदी बुंध्यापासून कापण्यात आले आहे. शहरातील कोणतेही झाड तोडण्यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र अशी कोणतीही परवानगी हे वृक्ष तोडताना घेण्यात आली नसल्याचे समजते. याबाबत महानगरपालिकेचे संबंधित झोनचे प्रमुख नामदेव राऊत यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)
पर्यावरणदिनी वृक्षांची कत्तल
By admin | Published: June 06, 2016 1:52 AM