अडीच हजार उद्योग सुरू : सुक्ष्म, मध्यम लघुउद्योगही सावरण्याच्या मार्गावर
राजेश मडावी
चंद्रपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्याने हजारो सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योगांचे अर्थचक्र थांबले. उत्पादन व विक्री, व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवरील सर्व व्यवहार ठप्प झाला. लॉकडाऊन कालावधीतच संपूर्ण वर्षभराची अर्थव्यवस्था गारद झाली. लघु व सुक्ष्म उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, या वर्षाला गुडबाय करताना गाळात रूतलेले अर्थचक्र आता गतिमान होऊ लागले आहे. ही जिल्ह्यातील उद्योग जगतासाठी सुखद घटना असली तरी नव्या वर्षाचे स्वागत करताना संपूर्ण अर्थव्यवस्था रूळावर येईल, याची वाट उद्योजगत पाहत आहे.
वाढू लागली उत्पादीत मालाची मागणी
लॉकडाऊनआधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघूु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर दोन महिन्यात २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये केवळ ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाला. कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यात प्रचंड अंतर होते. त्यामुळे उद्योगजगत हादरले. परंतु, या उद्योगांची चक्र आता सुरू झाले. उत्पादीत मालाची मागणी वाढली.
२७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला
कोरोनामुळे या वर्षात सुमारे २७ हजार व्यक्तींचा रोजगार बुडाला. जिल्ह्यातील राईसमिल, चंद्रपूर औद्योगिक महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, खते, सिमेंट, वाहने व विविध उद्योग क्षेत्रांनालागणारे सुटे भाग तयार करणाºया मध्यम कंपण्या, तेल गिरण्या, कृषी अवजारे, औष्णिक केंद्र व अन्य उद्योगांसाठी लागणारी तांत्रिक साधनांचे उत्पादन ठप्प झाले होते. सरत्या वर्षातील या सर्वात मोठ्या हाणीने २७ हजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली.
पोटासाठी अनेकांनी बदलविले व्यवसाय
कोरोना विषाणुने आतापर्यंतच्या जगण्याच्या शैलीवरच आघात केला. हातावर आणून पानावर खाणाºयांचे हाल झाले हजारो कुटुंबियांना रोजगारासाठी भटकंती करावी लागली. या कालावधीत हजारो व्यक्तींनी स्वत:चे व्यवसाय बदलविले.
आठवडी बाजारांनी मिळाला आधार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद केल्याने लहान दुकानदारांचे व्यवसाय बुडाले. बाजारांमुळे किती कोटींचा नुकसान झाला कळायला मार्ग नाही. प्रशासनानेही नुकसानीची नोंदणी केली नाही. मात्र, अनेकांना विक्रीयोग्य वस्तु घरीच ठेवून भाजीपाला विक्रीचे हंगामी व्यवसाय स्वीकारले. जुने वर्ष सरत असताना बाजार सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.