पारंपारिक शेतीला फाटा : दरवर्षी एक लाखांचे उत्पन्नबाबूराव परसावार सिंदेवाहीएकीकडे विदर्भातील काही शेतकरी नैराश्यातून आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडे काही शेतकरी मात्र आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आर्थिक प्रगती करीत आहेत. सिंदेवाही येथील माधव श्रावण आदे इयत्ता दहावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना कोणतेही पुस्तकी कृषी तंत्रज्ञान अवगत नाही. केवळ शेतात कोणत्या सुधारणा करता येईल, याचा सतत विचार करून त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला.माधव आदे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ते दरवर्षी खरीप हंगामात धान पीक निघाल्यानंतर ते रबी हंगामात एक एकरमध्ये भाजीपाला पिकाची लागवड करतात. १० आरमध्ये फुलगोबी व पत्तागोबी, १० आरमध्ये मुळा, १० आरमध्ये वांगे तर १० आरमध्ये लवकी व कोहळा आदींचे पीक घेवून आर्थिक नफा कसा मिळवावा, हे दाखवून दिले. धानाच्या पिकानंतर डिसेंबर महिन्यात ते भाजीपाला पिकांची लागवड करतात. एक एकरात बी-बियाणे, खते, निंदन मिळून त्यांना ३० हजार रुपये खर्च येतो. त्यांना दरवर्षी वांग्याचे उत्पादन ५० क्विंटल, लवकी १ टन, कोहळा ८० क्विंटल, फुलगोबी-पत्तागोबी ४० क्विंटलचे उत्पादन होते. खर्च वजा जाता निव्वळ नफा दरवर्षी एक लाख रुपये होते अशी माहिती आदे यांनी दिली.नियोजन आणि रोपाची योग्य निगा राखल्या गेली तर पिके चांगली येतात असा आदे यांचा अनुभव आहे. भाजीपाला पिकावर देखरेख करण्यासाठी घरचे कुटुंब शेतात काम करतात. शेतामध्ये विहिर व मोटार पंप आहे. सिंचनाच्या माध्यमातून दररोज सकाळी व सायंकाळी पाणी देण्याचे काम होते. ते शेतामध्ये सेंद्रीय खताचा वापर करतात व गायीचे गोमुत्र फवारणीसाठी वापरतात. तसेच आवश्यकतेनुसार ते किटक नाशक औषधीचा वापर करतात. भाजीपाला विक्री ते सिंदेवाही आठवडी बाजारात व दररोज सायंकाळी गुजरीमध्ये करतात. माधव आदे यांना पंचायत समिती स्तरावर भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल त्यांचा ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून सत्कार करण्यात आला. ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव असून माळी समाजाचे तालुका संघटक आहेत.
भाजीपाला लागवडीतून केली आर्थिक प्रगती
By admin | Published: April 05, 2017 12:41 AM