राज्य शिक्षण विभागाकडून दखल : उपक्रमाचे केले कौतूकवरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गालगत वरोरा शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांसाठी पालावरची शाळा प्रथमच सुरू केली. या शाळेची पाहाणी करण्याकरीता महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचा शिक्षणरथ बुधवारी येथे पोहोचला. शाळेचे कार्य बघून उपस्थितांनी उपक्रमाची प्रशंसा केली.वरोरा शहरानजीक जडीबुटी विकणारे २५ कुटुंब झोपड्या बांधून मागील काही दिवसांपासून राहत आहेत. यामध्ये ४० मुले, मुलीही आहेत. कोवळ्या वयात भटकंतीमुळे ही मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहिले, ही बाब जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते व गटशिक्षणाधिकारी आर. आर. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली. तेव्हा बाब हेरुन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता त्यांच्या पालकांना विश्वासात घेवून काही दिवसापूर्वीच त्यांच्या राहत्या ठिकाणी एका झोपडीत पालावरची शाळा सुरू केली. शाळेमधील मुलांचा उत्साह बघून पालकांनी शाळेसाठी वेगळा पाल टाकून दिला. खुशाल पाचभाई, मनिषा राऊत, बाळू जीवने, संतोष कोमरेड्डीवार, प्रतिभा हरणे हे विषयतज्ञ या भटकंती करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहेत. शाळा सुरू होताना परिपाठही घेवून शाळेला दररोज सुरुवात करण्यात येत आहे. तर त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचा शिक्षण रथ आज पालावरच्या शाळेत पोहोचला. त्यातील अधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी व पालकांशी हितगुज करुन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी डॉ. वासुदेव डहाके, शंकर पुंड, दिनानाथ वाघमारे, मुकूंदा अडेवार, अण्णा राऊत, सदाशिव हिवलेकर, राजेंद्र बडिये, ज्योती भारती, भाग्यश्री ठाकरे, प्रमोद काळबांडे, सोनवणे, अरुण उमरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक वडधा शाळेच्या पदविधर शिक्षिका उज्ज्वला खिरटकर, गजानन शेळके, जि.प. सदस्य नितीन मत्ते, गटशिक्षणाधिकरी आर.आर. चव्हाण, अनिल काळे, आर. आर. चौधरी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यातील पालावरच्या शाळेत पोहोचला शिक्षण रथ
By admin | Published: November 26, 2015 12:57 AM