साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थीशिक्षणापासून काही प्रमाणात दूर गेले आहे. सद्य:स्थितीत शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहिजे तशी चांगली नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच शैक्षणिक स्तर वाढवून त्यांना स्पर्धा परीक्षेला तयार करण्यासाठी सीईओ मिताली सेठी यांनी जिल्ह्यात शिक्षणदान हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये गावातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज दोन तास नि:शुल्क शिकविले जाणार आहे. हा उपक्रम पुढील चार महिने सुरू राहणार आहे.जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावातच मार्गदर्शन करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी वाढविली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही निधी खर्च केला जाणार नसून झिरो बजेटमध्ये विद्यार्थ्यांना समजेल, अशा पद्धतीने शिकविले जाणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाणार आहे.
अशी आहे शिक्षण दान संकल्पनादान ही आपल्या देशातील परंपरा आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार काही तरी दान करत असतो. आपण समाजाचे काही देणे लागले, या भावनेतून एकत्र येऊन आपल्या जवळ असलेले शिक्षण दान केले तर गावातील लहान मुलांना शिक्षणासाठी आपण सहकार्य करू शकतो. शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी दान केली तरी संपत नाही, उलट वाढतच जाते. त्यामुळेच जिल्ह्यात शिक्षण दान ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
पुढील चार महिने चालणार उपक्रमजिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये दररोज दोन तास स्वयंसेवकांच्या माध्यमातून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिकविले जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील चार महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांनंतर आणि चार महिन्यांनंतर विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रगती तपासणी जाणार आहे.
हे आहे लाभार्थीइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारे विद्यार्थी. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी राहणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, गणित शिकविण्यात येणार आहे.
मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी काही प्रमाणात शिक्षणापासून दूर गेले आहे. त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणून त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. त्यातील कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांना गरूडझेप अंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी कुठेच मागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-मिताली सेठी सीईओ चंद्रपूर