जिवती : आपण खूप शिक्षण घेतले याचा अर्थ असा नाही की आपण सर्व गुणसंपन्न आहोत. शिक्षणासोबत आपल्यामध्ये विनय असणे आवश्यक आहे. कारण शिक्षणाला विनयाची जोड असली की संपूर्ण जीवन माणुसकीत आणि मजेत जाते, असे प्रतिपादन दीपक महाराज पुरी यांनी केले.
जिवती येथील श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दीपक महाराज पुरी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती अंजना पवार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब देशमुख, विठ्ठल पुरी, प्राचार्य एस.एच. शाक्य उपस्थित होते. मनुष्याने उच्चत्तम शिक्षण घेतले पाहिजे. परंतु त्या शिक्षणासह विनयतासुद्धा अंगीकारली पाहिजे, अन्यथा मनुष्य रानटी व गर्विष्ठ बनतो व समाजाकरिता घातक ठरतो. याप्रसंगी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी महाविद्यालयाचा वार्षिक लेखाजोखा व प्रगतीबदल माहिती दिली. सदर कार्यक्रमात कला व विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन प्रा राऊत यांनी केले.