चंद्रपूर : 'समस्या तुमच्या - पुढाकार आमचा' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, प्रलंबित समस्यांबाबत समाधानकारक माहिती न देता चुकीची माहिती दिल्याचे आमदाराच्या लक्षात येताच त्यांनी खडसावले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना भर सभेमध्ये माफी मागावी लागली.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील जवळपास २५ सामूहिक व अनेक प्रलंबित असलेल्या वैयक्तिक समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी काही समस्यांची सभेमध्ये समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. परिणामी सभा चांगलीच वादळी ठरली. प्रलंबित समस्यांचे स्पष्टीकरण देताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. या सभेमध्ये अधिकारी व समस्याग्रस्त कर्मचारी समोरासमोर असल्याने थेट प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत व याच विषयावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देश आ. अडबाले यांनी शिक्षक विभागाला दिले. जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभेत माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देशमुख, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, जगदीश जुनघरी, शिक्षक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, समस्याग्रस्त शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.