चंद्रपूर : या वर्षी पावसाळ्यात पुरामुळे तसेच साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची कोणतीही हानी होणार नाही, यासाठी प्रभावी उपायोजना राबवाव्यात, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून, या संदर्भातील निवेदन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राम जंगम, हरमन जोसेफ, देवा कुंटा, आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरामध्ये दरवर्षी पावसाच्या दिवसांत विविध लोकवस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी घुसते. यामध्ये मोठे नुकसान होते. चंद्रपूर शहरातील नागरिकांची पावसाळ्यात कुठलीही तारांबळ होऊ नये याची पूर्णत: जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. महापालिका हद्दीतील नदी व नाल्या पात्रांलगत लोकवस्त्यांना आवश्यक सूचना देण्यात यावात; तसेच प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करीत आताच पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.