लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील लाडज हे गाव तालुका १२ किमी अंतरावर असून वैनगंगा नदीने या गावाला चारही बाजूंनी वेढले असल्याने सदर गावाला ‘बेटाचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील शेतजमीन वैनगंगा नदीच्या पुरामुळे अत्यंत सुपीक झाली असून भाजीपाल्याची बाजारपेठ म्हणून लाडज तालुक्यात प्रसिद्ध आहे.या गावाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने १९८० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील ‘गांधीनगर’ याठिकाणी पुनर्वसन केले. पुनर्वसनाच्या वेळी जवळपास तीनशे कुटुंब गांधीनगर येथे स्थलांतरित झाले. परंतु काही लोकांनी स्थलांतरित न होण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या गावाचे पुर्णपणे पुनर्वसन झाले नाही. सद्यस्थितीत या गावाची लोकसंख्या १३३५ असून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरू आहे. २०१२ मध्ये २५ लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १३०० मीटर रस्त्याचे खडीकरण झाले. आजपर्यंत ६०-७० लाख रुपयांचे सिमेंटचे रस्ते या गावात बांधण्यात आले आहे. या गावात ९६७ हेक्टर सुपीक जमीन असून लाडज, चिखलगाव, सोंद्री, सुरबोडी, पिंपळगाव (भो) या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी याठिकाणी आहेत. जर शासन लाडजवासीयांना १९८०मध्ये पुनर्वसन होऊनसुद्धा एवढया मोठया प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे तर मग चिखलगाव ते लाडज या नदीपात्रात तीनशे मीटर अंतराचा पूल-कम-बंधारा का बांधून देत नाही, असा संतप्त सवाल लाडज, चिखलगाव येथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन या महत्वपूर्ण समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेतलेग्रामस्थांसोबत घेतली बैठकनिवडणुकीवर बहिष्कार टाकू नये, यासाठी गावकऱ्यांची समजूत घालण्यासाठी ब्रम्हपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा आग्रह धरला. परंतु येथील नागरिक बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत पूल-कम-बंधारा बांधून देण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे दस्तऐवज शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय दोन्ही गावातील नागरिकांनी केला आहे.
बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:25 PM
चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देलाडज, चिखलगाववासी निर्णयावर ठाम