हंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी विकास आढावा बैठक, कामांचे अहवाल सादरचंद्रपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाकाक्षी योजनांची अंमलबजावणी करून भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लक्ष्य कालबद्ध वेळेत पूर्ण करून या योजनांचा लाभ तालुकानिहाय अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवितानाच सिंचन व अन्य योजनांना रचनात्मक स्वरूप देवून शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता या योजा प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी कृषी विभागाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सदर आढावा बैठकीस कृषी विभागाचे उपसंचालक घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनावदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी देशमुख, जि.प.चे कार्यकारी अभियंता (सिंचाई) सहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस भाजपाचे जेष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सचिव राहुल सराफ, तुळशीराम श्रीराम, नरेंद्र जीवतोडे, राजू घरोटे, राजू येले, महेश देवकाते, अॅड. प्रशांत घरोटे, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, शेख जुम्मन रिझवी उपस्थित होते.सदर आढावा बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजना, केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मागेल त्याला शेततळे, बोडी, जिल्ह्यातील डब्ल्यू १६ मेगा पाणलोट व डब्ल्यूजीएएम २ मेगा पाणलोट, मृदा संधारण, कुकूटपालन, मधुमक्षिकापालन, सौर दिवे, सौर पथदिवे, कृषी साहित्य, प्रेरक प्रवेश उपक्रम आदी योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास कामाची माहिती आकडेवारीनुसार सादर करण्यात आली.यावेळी खरीप व रब्बी हंगामानंतर उपलब्ध खत साठ्याचा आढावा, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतानाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ सर्वव्यापी होण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. लक्षांकापेक्षा जास्त आलेल्या अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामध्ये सुकरता येण्याकरिता व या योजनेचा लाभ परिवारातील सदस्यांना मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ना. अहीर यांनी दिल्या. (नगर प्रतिनिधी)
कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे!
By admin | Published: January 12, 2017 12:40 AM