बल्लारपूर : शहरात डेंग्यू पसरल्याची दक्षता घेऊन नगरपालिकेचे कर्मचारी व आशा कार्यकर्त्या, आरोग्यसेवक मागील एक महिन्यापासून घरोघरी जाऊन डासअळीचे सर्वेक्षण करीत आहेत. यासोबत पालिकेचे कर्मचारी धूरफवारणीही करत आहेत. आता या कामासाठी इतर संस्थांनीही पुढाकार घेतला असून, त्यांचे कार्यकर्ते वॉर्डात मशीनने धूरफवारणी करून वॉर्ड डासमुक्त करत आहेत.
या कामासाठी आम आदमी पक्षाचे रवी पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अफजल अली, राकेश वडस्कर, पवन वैरागडे, ज्योती बाबरे, किरण खन्ना व त्यांचे कार्यकर्ते वॉर्डात जाऊन धूरफवारणी करीत आहेत. दुसरीकडे भाजपच्या नगरसेविका सारिका कनकम व सामाजिक कार्यकर्ते सतीश कनकम यांनी आंबेडकर वॉर्ड परिसरात धूरफवारणी करून डेंग्यू पळवा मोहीम सुरू केली आहे.
संतोषी माता वॉर्डात सामाजिक कार्यकर्ते सुमित डोहने व राकेश सोमाणी यांनीही आपले कार्यकर्ते लावून वॉर्डात धूरफवारणी केली व वाॅर्डातील नागरिकांना जागरूक केले आहे. श्रीराम वॉर्डात सामाजिक कार्यकर्ता शुभम बहुरिया व त्यांच्या चमूने वॉर्डात मच्छर भगाओ मोहीम राबवून धूरफवारणी केली आहे. लोकसहभागामुळे शहर डेंग्यूमुक्त होणार, असा आशावाद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.