लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत टंचाई सदृष्य भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी, दूध, फळे दिली जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितांचे प्रमाण वाढविण्यासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता २२ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत १९९५ ते २००२ पर्यंत फक्त तांदूळ देण्यात येत होते. यानंतर २००२ पासून शिजविलेले अन्न देण्यास प्रारंभ करण्यात आले. २००८ पर्यंत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळेमध्ये ५ व्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. २००८ पासून ही योजना ८ वी पर्यंत वाढविण्यात आली. टंचाईसदृष्य भागात करावयाच्या उपाययोजने संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आठवड्यातून किमान तीन दिवस विद्यार्थ्यांना अंडी, दूध, पौष्ठीक आहार देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दुष्काळग्रस्त, टंचाईसदृष्य भागात शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे असा पौष्टिक आहार पुरविण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत प्रती विद्यार्थी प्रती दिन पाच रुपये याप्रमाणे प्रती विद्यार्थ्यी प्रती आठवडा १५ रुपये खर्च करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार अंडी, दूध, फळे
By admin | Published: June 10, 2017 12:35 AM