पाटण : सतत दुसऱ्या वर्षीही रमजान महिन्यात कोरोनाचे सावट असून यंदाही रमजान महिना कोरोना संसर्गातच गेला आहे. एकमेकांमध्ये बंधुभावाचे नाते निर्माण करणारा व प्रेमभावना वाढीस आणणारा मुस्लीम बांधवांचा रमजान ईद उत्सव शुक्रवारी संपूर्ण देशात साजरा होत आहे. मात्र, कोरोनाच्या सावटात यंदाही ईदची नमाज घरातच अदा केली जाणार आहे.
रमजान महिन्यात मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर रोजे ( उपवास ) ठेवतात. पहाटे ५ पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपवास. सायंकाळी ६ च्या दरम्यान उपवास सोडायचा हा रमजान ईदचा नियम आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव पहाटे ५ वाजतादरम्यान भोजन करतात. ३० उपवास संपल्यावर ईदची नमाज अदा करण्यात येते.
रमजान महिन्यात घराघरात शेवया बनविणे सुरू केले जाते. त्यानंतर बंधुभाव जपण्यासाठी शिरखुरमा खाण्यास इतरांना आमंत्रित केले जाते. मात्र, यावेळी कोरोना संसर्गामुळे या आनंदावर काहीसे विरजण पडणार आहे.