चंद्रपूर : जर्मनीतील ड्युसबर्ग शहरात नुकत्याच पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत चंद्रपुरातील आठ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. इतकंच नाही तर ही स्पर्धा जिंकत चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवले आहे. मानसिक रोगतज्ज्ञ डाॅ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. संदीप मुनगंटीवार, एमबीबीएस विद्यार्थिनी नबा शिवजी, डॉ. अभय राठोड, डॉ. रिजवान शिवजी, डॉ. गुरुराज कुलकर्णी अशी या यशस्वी डॉक्टरांची नावे आहेत. यात चंद्रपुरातील एपीआय बल्की यांनीसुद्धा सहभाग घेऊन ही स्पर्धा गाजवली. यापूर्वी चंद्रपुरातील डॉ. विश्वास झाडे हे या स्पर्धेत सहभागी झाले होते.
आयर्न मॅन ट्रायलॉथमध्ये सुमारे १.९१ किमी जलतरण, ९१ किमी सायकलिंग आणि २१ किमी हाफ मॅरेथॉनचा समावेश असतो. जर्मनी येथे झालेल्या या स्पर्धेत जगभरातील २ हजार तर चंद्रपूरमधील नऊ जण सहभागी झाले होते. या सर्वांनी मागील नऊ महिने चंद्रपुरातील कडक हवामानात प्रशिक्षण घेत या स्पर्धेची तयारी केली होती. ही स्पर्धा म्हणजे शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक चपळतेची कठीण परीक्षा मानली जाते.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या कोणत्याही शाखेने एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. साडेआठ तासांच्या कालावधीत सर्वांनी तिन्ही इव्हेंट पूर्ण करून आयर्न मॅनचा किताब पटकावला. या सर्वांना क्रीडा प्रशिक्षक रोशन बुजाडे, धनंजय वड्याळकर, निळकंठ चौधरी, कैलास खिरडे, प्रशांत मृत्युरपवार यांनी मार्गदर्शन केले. सपोर्ट टीम म्हणून डॉ. सिद्दिका शिवजी, डॉ. इर्शाद शिवजी, हर्ष अस्वार यांनी सहकार्य केले.