चिंचाळा (शास्त्री) येथील घटना : तीन जण भाजले, जीवनावश्यक वस्तू जळाल्याशंकरपूर : येथून जवळ असलेल्या चिंचाळा (शास्त्री) येथील एका घराला अचानकपणे आग लागली. आगीने पाहता पाहता उग्र रूप धारण करून आठ घरांना कवेत घेतले. त्यामुळे आठही घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले. ही आग विझविताना दोघे भाजल्याने ते गंभीर जखमी आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.चिंचाळा शास्त्री येथील संजय विकास सुखदेवे यांच्या घराला सर्वप्रथम आग लागली. ही आग पसरत जावून भाऊराव भदू दडमल यांच्या घराला लागली. त्यांच्या घरी सिलिंंडर असल्याने गॅस सिलिंडर स्फोट झाला. त्यामुळे आगीने उग्ररूप धारण केले. त्यात गोपिचंद बापूराव दडमल, तानबा मनू दडमल, उद्धव श्रावण रामटेके, शंकर गजभिये, लटू तुळशीराम मेश्राम, रामटेके यांच्या घरांना कवेत घेतले. ही आग पुन्हा इतर घरांना कवेत घेण्याची शक्यता असताना गावकऱ्यांनी लगेच शर्तीचे प्रयत्न करून आग विझविली. संपूर्ण गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. आग लागल्याची माहिती मिळताच शंकरपूरवरुन जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी टँकर पाठविला. तसेच प्रशासनाकडून वरोरा येथून अग्निशमन गाडी पाठविली. परंतु, तोपर्यंत आठही घरे जळून राख झाले होते. प्रशासनाने पीडिताना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)आग विझवताना दोघे जखमीज्यांची घरे जळाली ते गरीब शेतकरी असून धान, कापूस, तूर व इतर अन्नधान्य यासोबतच घरी असलेले पैसे, दागिने जळून खाक झाले. ही आग विझविताना गावातील संपत हनबा दडमल (५५) व राजेश्वर दयाराम दडमल (३६) हे भाजल्या गेलेत. त्यांना शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून पंचनामा, पीडितांना मदतप्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजमाले, भिसीचे ठाणेदार तामटे, तलाठी पडगिलवार हे घटनास्थळ गाठून उशीरापर्यंत पंचनामा करीत होते. त्यामुळे नेमके किती रुपयाचे नुकसान झाले, ही माहिती मिळू शकली नाही. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, माजी सभापती घनश्याम डुकरे, भिसीचे सरपंच अरविंद रेवतकर, उपसरपंच लिलाधर बन्सोड, पंचायत समितीचे सदस्य रोशन ढोक यांनी घटनास्थळाला भेट दिली. जि.प. सदस्य ममता डुकरे यांनी पीडिताना पाच हजार रुपयाची मदत दिली.
आगीत आठ घरे जळून खाक
By admin | Published: March 01, 2017 12:39 AM