कोरपना : गडचांदूर येथील राजीव गांधी चौक ते अल्ट्राटेक सिमेंट (माणिकगड) कंपनीपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू असून, केवळ अर्धा किलोमीटर रस्त्यासाठी आठ महिने पूर्ण होऊनही काम अपूर्ण असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
राज्य शासनाकडून कोरपना तालुक्यातील भोयगाव ते जिवती तालुक्यातील वणीपर्यंत मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान गावाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक ते जुन्या माणिकगड सिमेंट कंपनीपर्यंतचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी दुभाजकासह अर्धा किलोमीटर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम मंजूर आहे. या रस्त्याचे खोदकाम करून आठ महिन्यांपूर्वी काम सुरू केले. मात्र अद्याप केवळ १० टक्केच काम पूर्ण झाले आहे.
रहदारी व वर्दळीचे ठिकाण असल्याने या कामाला कंत्राटदाराने प्राधान्य देऊन लवकरात लवकर काम करणे अपेक्षित होते. मात्र वारंवार निवेदने देऊनही कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
किरकोळ अपघातांची मालिका
एका बाजूने रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्यामुळे दुसरी बाजू रहदारीसाठी सुरू आहे. मात्र या ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून वारंवार दगड-माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे डोळ्यात धुळीचे कण जाऊन, तर पावसात वाहन घसरून दुचाकीचालकांचे किरकोळ अपघात होत आहे.
आमदारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
आमदार सुभाष धोटे यांनी वारंवार सूचना देऊनसुद्धा कंत्राटदार गडचांदूर शहरातील महत्त्वाचे असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम प्राधान्याने करीत नसेल, तर अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
- अरुण निमजे, माजी सभापती, जि. प. चंद्रपूर