पोलीस भरती : १२ हजारावर उमेदवारांचे अर्जचंद्रपूर: सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी जिल्ह्यासह इतर विदर्भातील तब्बल १२ हजारावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यातील केवळ ३ हजार ८२१ उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाले आहे. तर, तब्बल ८ हजारावर विद्यार्थी अपात्र ठरले आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जून रोजी विविध शाळा महाविद्यालयातून घेण्यात येणार आहे.बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासकीय नोकरी मिळविण्यासाठी सध्या बेरोजगार धडपडत आहे. पूर्वी पोलीस विभागात नोकरी करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे शारीरिक पात्रतेच्या भरोवश्यावर नोकरी मिळविता येत होती. आता मात्र तशी परिस्थिती राहीली नाही. उमेदवारांची बौद्धिक तथा शारीरिक चाचणी झाल्यानंतरच पोलीसमध्ये नोकरी मिळविता येते. यासाठी विद्यार्थी परिश्रम घेतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. पहाटेपासून शारीरिक व्यायामाकडे सुद्धा विद्यार्थी लक्ष केंद्रीत करतात. यावर्षीच्या भरतीमध्ये जिल्हा तसेच विदर्भातून तब्बल १२ हजारावर उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केला आहे. या उमेदवारांची टप्प्याटप्प्याने शारीरिक चाचणी घेण्यात आली. यामध्ये ८ हजारावर उमेदवार अपात्र झाले आहे. त्यामुळे पोलीस विभागात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तर, ३ हजार ८२१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यातून गुणवत्तेनुसार यादी लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवारांची संख्याही मोठी आहे. २ हजार ७०० महिला उमेदवारांनी अर्ज सादर केले. यातील आठशे महिला लेखी परिक्षेसाठी पात्र ठरल्या. शारीरिक चाचणी पहाटेपासून तर दुपारपर्यंत तसेच सायंकाळी घेण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
आठ हजारावर उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र
By admin | Published: June 22, 2014 11:59 PM