संजय अगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र अप्पर तळोधी (बा.) तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या गावात असा उपक्रम राबविला जात असल्याने कौतुक केले जात आहे.सार्वजनिक गणपती मंडळ असे या सावरगावच्या गणेश मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१७ या ८४ वर्षांच्या कालावधीत मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले. हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. त्यानंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे हे अध्यक्ष झाले तर आता मोरेश्वर कुकसू ठिकरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.खरे तर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील राजकारणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात असते. निवडणूक कोणतीही असो, निवडणूक आली की ‘दोन धु्रवावर दोघे आपण’ अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत असतात. तसेच तंटामुक्तीच्या माध्यमातून अनेक वाद मिटविले जाते. राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होवून जाते. संपूर्ण गावाचा उत्सव होवून जातो. राजकीय मतभेद कितीही असोत, पण यावेळी मतभेदाना मुळीच थारा नसतो. गणेशोत्सवातील दहा दिवस एकोप्याचे वातावरण राहते. कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचारही नसतो. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. केवळ गावकरीच नाही तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.सावरगावचे हे गणेश मंडळ केवळ उत्सवापुरतेच मर्यादित नाही. या मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे गावात करण्यात आली आहेत. या मंडळाच्या मिळकतीतून गावात श्री गुरुदेव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. एका स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. १० हजार लोकसंख्येच्या स्वयंपाकासाठी पुरतील एवढी भांडीकुंडी खरेदी करण्यात आली आहेत. आणि नुकतेच चार लाख रुपये किमतीचे एक प्रशस्त घरही विकत घेण्यात आले आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने एक स्वयंपूर्ण गाव या मंडळाने निर्माण केले
सावरगावात ८४ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:14 AM
गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.
ठळक मुद्देएकोप्याचे वातावरण : दहा दिवस राजकारण ठेवले जाते बाजूला