काँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला-विजय वडेट्टीवार
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे पक्षाने एक सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली. या महान नेतृत्वाला श्रद्धांजली अर्पण करून कठीणप्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठी झटणारा लोकनेता- खासदार बाळू धानोरकर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातील अनुभवी व लोकांच्या हितासाठी झटणारे नेतृत्व आज हरपल्याची भावना खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.
धर्मनिरपेक्षतेची पाठराखण करणारा नेता -प्रतिभा धानोरकर
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे पिताश्री व चंद्रपूर जिल्ह्याचे माजीे पालकमंत्री एकनाथ गायकवाड हे धर्मनिरपेक्ष विचारांची पाठराखण करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी विधानसभा क्षेत्रातून त्यांनी आमदार म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले, या शब्दात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
जिल्ह्याच्या विकासात लक्षणीय योगदान - नरेश पुगलिया
सन २००४ ते २००९ या कार्यकाळात एकनाथराव गायकवाड हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकासात लक्षणीय योगदान दिले. ते सर्वसामान्यांचे नेते होते. आंबेडकर विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. मुंबईत मनोहर जोशी यांना पराभूत करून ते लोकसभेत गेले. शोषित व गरीब समाजाच्या प्रश्नांकडे त्यांचे विशेष लक्ष होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी व्यक्त केली.