मूल (चंद्रपूर) : मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत असताना रविवारी वनविभागाच्या बफर क्षेत्रात पुन्हा एका इसमावर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. ही घटना रविवारी मारोडा येथील कक्ष क्रमांक ७७९ मध्ये घडली. (tiger attack on Elder man at chandrapur)
मनोहर आडकूजी प्रधाने (६८) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. मूल तालुक्यात वनविभागाचे प्रादेशिक, बफर आणि महामंडळाचे वनक्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. सदर जंगलात मोठया प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर आहे. दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मारोडा येथील डोंगरदेवी रोडवर सुरु आहे. या कामावर दीपक मनोहर प्रधाने आणि वर्षा दीपक प्रधाने गेले होते. त्यांना जेवणाचा डब्बा नेऊन देण्यासाठी दीपकचे वडील मनोहर आडकूजी प्रधाने गेले होते. कामावर पाणी नसल्यामुळे मनोहर प्रधाने यांनी वनविभागाच्या बफर क्षेत्रातील कक्ष क्र. ७७९ येथील नाल्यावर पाणी आणण्यासाठी रविवारी सकाळी ९ वाजता दरम्यान गेले होते. मात्र भरपूर वेळ होऊनही परत न आल्याने दीपक प्रधाने वडिलांना शोधण्यासाठी नाल्यावर गेला असता मनोहर यांचा मृतदेह आढळून आला. सदर माहिती दीपक यांनी वनविभागाला दिली.
वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. घटनास्थळाला वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकमोडे, मारोडाचे सरपंच भिकारू शेंडे यांनी भेट दिली.
जंगलातील पाण्याच्या ठिकाणी कोणीही फिरू नये
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलात इतरत्र भटकंती करीत असतात. त्यामुळे कोणीही जंगलामध्ये पाण्याच्या ठिकाणी फिरू नये, असे आवाहन वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर यांनी केले आहे.