रवींद्र ठमकेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जन्मत:च दारिद्र. हाती पैसा नाही. हातावर आणून पानावर खाऊन जगणे असे नशिब. जिथे पोटापाण्याचा प्रश्न मिटत नाही, तिथे हक्काचे घर म्हणजे दिवास्वप्नच. राजुरा-चुनाळा मार्गावरील बसस्थानकानजिक असलेल्या वळणावर चक्क फुटपाथवर झोपडी थाटून या वृध्द माऊलीचा संसार अनेकांच्या काळजाला चिरे पडणारा आहे. शासनदरबारी कायम उपेक्षितच असल्याने या वृध्द माऊलीचा फुटपाथवरील संसार पाच वर्षांपासून तिथेच आहे.राजुरा येथील रूखमाबाई नत्थु श्रीनाथ (७०) व राजाराम नत्थु श्रीनाथ (४५) या मायलेकांची व्यथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. रुखमाबाई श्रीनाथ ही वृध्द माऊली गेल्या अनेक वर्षांपासून राजुरा शहरात वास्तव्य करते. चणे, फुटाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पूर्वी ही वृध्द महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कमीतकमी किराया असलेल्या घरात राहायची. त्यानंतर मुलाचे लग्न झाले, मात्र काही दिवसातच मुलाची पत्नी कायमची माहेरी निघून गेली. कामधंदा नसल्याने चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. जवळ पैसा नसल्याने किराया द्यायला पैसे नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या मायलेकांनी राजुरा बसस्थानक परिसरात असलेल्या टर्र्नींग पॉर्इंटवर चुनाळा मार्गावर गेल्या पाच वर्षांपूर्वी फुटपाथवर झोपडी थाटली. रुखमाबाईजवळ कमावून ठेवलेली कोणतीही तुटपुंजी मिळकत नाही. मागील आठवडयात आलेल्या वादळी पावसाने या वृध्द मातेची फुटपाथवर थाटलेली झोपडी डोळ्यादेखत अक्षरश: उडून गेली. एका पोत्यात मावणारे तिचे संसाराचे जीवन उपयोगी साहित्य आभाळाखाली आले. रुखमाबाईला राशनचे अन्नधान्य मिळते, हीच तेवढी शासनाची मदत. लॉकडाऊन झाल्याने चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मायलेकरांचा व्यवसाय कायम बुडाला. हाती पैसा नसल्याने कधी उपाशी रहावे लागल्याची व्यथा रुखमाबाईने ‘लोकमत’जवळ सांगितली. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न शासनाकडून नागरिकांना दाखविले जात असतानाच दुसरीकडे वृध्द मातेसह तिचा मुलगा गेल्या पाच वर्षांपासून फुटपाथवर तुटक्याफुटक्या झोपडीत दिवस काढत आहे. आयुष्याच्या सायंकाळीही या वृध्द माऊलीचा जगण्याचा संघर्ष अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. समाजात शासन आणि अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. या वृध्द मातेलाच आज ममत्वाची गरज आहे. त्यासाठी कोण पुढे येईल, हा प्रश्न आहे.
वृद्ध मातेचा पाच वर्षांपासून फुटपाथवरच संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 2:26 PM
राजुरा-चुनाळा मार्गावरील बसस्थानकानजिक असलेल्या वळणावर चक्क फुटपाथवर झोपडी थाटून या वृध्द माऊलीचा संसार अनेकांच्या काळजाला चिरे पडणारा आहे.
ठळक मुद्देरुखमाबाई शासनदरबारी उपेक्षितच गरिबीमुळे आयुष्यच पांगले