चंद्रपूर : येथील महेश नगरातील ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी धडपड सुरु केली आहे. यासाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे, या वृक्षांच्या संवर्धनाची ही जबाबदारी उचलली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठांनी जनजागृती ही सुरु केली आहे.
महेशनगरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात आला आहे, या माध्यमातून विविध उपक्रम सुरु आहे. यातील पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठांनी उचललेले पाऊल तरुणांनाही लाजवेल असेच आहे. मागील काही वर्षांपासून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. आता या वृक्षांचा वाढदिवस साजरा करून त्यांना जगविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली आहे. वृक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांचा बोलावण्यात आले होते. त्यांच्या हस्ते विविध वृक्षांची पूजा अर्चना तसेच राखी बांधण्यात आली. तसेच परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तथा सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी विश्वनाथ तामगाडगे यांनी दिले. कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाब लोणकर, सचिव विश्वनाथ तामगाडगे, गंगाधर पिदुरकर, शंकर गेडेकर, वामन मंदे, तुळशीराम नरड, दयाराम उराडे, जगन्नाथ गुरनुले, प्रभाकर देठेकर, रत्नमाला नरड, संध्या सहस्त्रबुद्धे,सुरेखा लडके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बाॅक्स
आयुक्तांच्या उपस्थितीमुळे समस्या सुटण्याची आशा
महेशनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहे. या समस्या सोडविण्याची विनंती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी जुलै महिन्यामध्येच महापालिकेला निवेदन दिले होते. मात्र अद्यापही समस्या सुटल्या नाही. दरम्यान, वृक्षांचा वाढदिवस कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयुक्तांना बोलाविले. विशेष म्हणजे, त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे आता तरी वार्डातील समस्या सुटतील, अशी आशा येथील ज्येष्ठ नागरिकांना आहे.