राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतल्याने निवडणूक मुहूर्त आता मार्च २०२२ पर्यंत लांबणीवर गेला आहे. जिल्ह्यात आजमितीस नऊ बाजार समित्यांची मुदत संपली. मार्च २०२२ पर्यंत पुन्हा तीन अशा एकूण १२ बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व बाजार समित्याच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. निवडणुका घेण्याबाबत प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश काढले होते. मात्र, निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. परिणामी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने आपले यापूर्वीचे दोन्ही आदेशही रद्द केले. जिल्ह्यात नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. प्राधिकरणाने निर्णय रद्द केल्याने या निवडणुका आता लांबणीवर गेल्या. नवीन आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जारी करतील.
कोरोना प्रादुर्भावामुळे तीनदा मिळाली होती निवडणुकीला मुदतवाढकोरोनामुळे यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना यापूर्वी ३० जून व ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा निवडणुका स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था यामधून वगळण्यात आल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात ३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुका आता लांबणीवर गेल्या. याबाबत आजच व्हीसी झाली. मार्च २०२२ पर्यंत या निवडणुका होऊ शकतात. सध्या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कटाक्षाने अंमलबजावणी सुरू आहे. - प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर
३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील आधी ३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला. उर्वरित ३१७ सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे.