लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यातील त्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. उल्लेखनीय असे की, या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती.वास्तविक या निवडणुका नोव्हेंबर महिन्यातच होणार होत्या. ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेधही लागले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन या निवडणुकांना स्थगिती दिली होती. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे प्रशासक नेमण्याची नुकतीच कार्यवाहीसुद्धा करण्यात आली.तालुक्यातील मिंथूर, चिखलगाव, मांगली अरब, गिरगाव आणि गोविंदपूर या ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र होत्या. या ग्रामपंचायतींची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली. म्हणूनच या निवडणुकीला घेऊन या गावांमध्ये चावडीवर गप्पा रंगायला लागल्या होत्या. गावात उमेदवारांचे पॅनलही तयार करण्यात येत होते.मागील वेळेस या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट झाली होती. याहीवेळेस येथील सरपंचांची निवड थेट पद्धतीनेच होणार आहे. प्राप्त माहितीनुसार मिंथूरचे सरपंचपद अनु.जातीच्या महिलेकरिता राखीव आहे. चिखलगाव अनु.जमाती महिला, मांगली अरब अनु.जमाती महिला, गिरगाव सर्वसाधारण महिला तर गोविंदपूरचे सरपंचपदही सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. यादृष्टीने योग्य उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली होती. मात्र, आता या सर्व उत्साहावर विरजण पडले होते. तालुक्यात राजकीयदृष्ट्या ज्या काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहेत, त्यात या पाचही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. म्हणूनच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींकडे तालुक्यातील राजकीय पक्षांचेही लक्ष लागून होते.