चंद्रपूर : वीज पुरवठा सुरळीत राहावा, अपघात होऊ नये, यासाठी सुयोग्य स्थितीत वीज खांब, तारा तसेच रोहित्र असणे आवश्यक आहे. मात्र चक्क जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या बंगल्यासमोरील वीजरोहित्र अतिशय धोकादायक स्थितीत उभे असून, लोखंडी पट्ट्यांचा सपोर्ट देऊन वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याशेजारील पोल तसेच रोहित्राची अशी अवस्था असेल, तर जिल्हयातील दुर्गम भागात काय अवस्था असेल, याचा विचार न केलेलाच बरा.
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक असे एकूण ४ लाख ९ हजार ४४ ग्राहक आहेत, तर ४१ हजार ६३४ कृषी ग्राहक आहेत. दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात, तर वीज ग्राहकांच्या समस्या नित्याच्याच आहेत. आता तर चक्क जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचा बंगला असलेल्या जिल्हा स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रोहित्राचे वीज खांब वाकलेल्या अवस्थेत असून, त्यावरच धोकादायक स्थितीत रोहित्र बसविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहात असलेल्या बंगल्याशेजारील वीज खांब तसेच रोहित्राकडे जर वीज महामंडळ लक्ष देत नसेल, तर इतर गावांची काय अवस्था असेल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसामध्ये अनेकवेळा वादळ येण्याची शक्यता असते. अशावेळी एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किमान आता जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देऊन बंगल्याशेजारीच नाही, तर जिल्हयातील दुर्गम भागातील वीज खांबांची अवस्था जाणून सामान्य ग्राहकांना नियमित वीज पुरवठा तसेच सुरक्षितता द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
बाॅक्स
रोहित्राची स्थिती
न्यू कलेक्टर
एफ : आकाशवाणी
डीटीसी नंबर ४३२६८७०
डीटीसी सीएपी १०० केव्हीटी
---
कोट
या विषयासंदर्भात दुरुस्ती वर्कऑर्डर निघाली आहे. दुरुस्ती होत असेल, तर खांबाची दुरुस्ती किंवा नव्याने वीज खांब बदलून वीज रोहित्र सुरळीत केले जाणार आहे. यासाठी निधीची गरज होती. तो प्रश्नही आता सुटला आहे.
- उदय परासखानेवाला
कार्यकारी अभियंता, वीज परिमंडळ, चंद्रपूर