अधीक्षक अभियंता : कोठारी येथे घेतली बैठककोठारी : कोठारीसह १० ते १२ गावातील वीज समस्या गंभीर बनली असून गावकऱ्यांच्या रोषाला वीज कर्मचाऱ्यांना बळी पडावे लागत आहे. त्याची दखल घेत अधीक्षक अभियंता हरीश गजभे यांनी कोठारी विश्रामगृहात गावकऱ्यांसेमत बैठक ठेवून येत्या आठ दिवसात वीज समस्या पूर्णपणे निकाली काढण्याचे आश्वासन देत गावकऱ्यांचे समाधान केले.कोठारीत ३३ के.व्ही. उपकेंद्र निर्माण झाल्यापासून वीज समस्या विस्तारण्याऐवजी वाढतच गेली. बारा गावातील जनता व शेतकरी अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त आहेत. अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यास केराची टोपली दाखविण्यात आली. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शमार, जि.प. सभापती देवराव भोंगळे, उज्ज्वल धामनगे, मोरेश्वर लोहे, सुनील फरकडे यांनी पुढाकार घेऊन वीज समस्या सुरळीत करण्यासाठी वेळोवळी बैठका आयोजित केल्या. तरीही वीज समस्येवर तोडगा काढण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले. जनतेत याबाबत तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. त्यानुषंगाने अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनी कोठारी विश्रामगृहात गावकऱ्यांसोबत वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता नेटाने काम करावे, खंडीत वीज पुरवठा नियमित करण्यासाठी वेगवेगळ्या उपकेंद्रातून वीज पुरवठा घ्यावा, लाईनवर आलेल्या झाडांची कटाई करावी व अडथळा दूर करावा तसेच भविष्यात वीज पुरवठा खंडीत होणार नाही, यासाठी बल्लारपूर व तोहोगाव या केंद्रातून सस्पेक्शन लाईन टाकावी, अशा सूचना कार्यकारी अभियंता नितीन चोपडे, उपविभागीय अभियंता ठाकरे व शाखा अभियंता रामटेकेकर यांना केल्या. बैठकीला जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु, सुनील फरकडे, सुरेश राजुरकर, अमोल कातकर, विनोद बुटले, सोमेश्वर पद्मगिरीवार, धीरज बोंंबोडे, प्रशांत टिंबडिया, अनिल मुंडे उपस्थित होते. (वार्ताहर)
आठ दिवसांत निकाली निघणार वीज समस्या
By admin | Published: June 30, 2016 1:04 AM