चंद्रपूर: जिल्हा परिषदेत बुधवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. ही बैठक वेळेवर न घेण्यात आल्याने काही सदस्यांनी बैठक स्थगित करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, बैठकीला अधिकारी नसल्याने सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी वित्तमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेलो असल्याचे सांगताच दारुबंदी आणि जिल्हा परिषदेचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करून एका सदस्याने ग्लास फोडून संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे बैठकीत चांगलाच गोंधळ निर्माण झाला.जिल्हाधिकारी कार्यालयात लघुगटांची बैठक होती. त्यामुळे सर्वच अधिकारी या बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांविनाच ही बैठक जिल्हा परिषद सदस्यांना घ्यावी लागली. दुपारी एकला सुरु होणारी ही बैठक तब्बल एक तास उशिराने सुरू झाली. काही सदस्यांनी बैठक स्थगित करावी, अशी मागणी केली. दरम्यान काही अधिकारी आल्याने सभा सुरु करण्यात आली. दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम पालकमंत्री गावात आले. त्यांच्या स्वागतासाठी आपण गेलो असल्याचे सांगितल्याने बैठकीला वेळ झाल्याचे सांगताच दारूबंदी आणि जिल्हा परिषदेचा काय संबंध, हे विचारत ग्लास फोडून राग व्यक्त केला. त्यानंतर विषयावर चर्चेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान मृत्यू झाल्यास त्याला दोन हजारांची सानुग्रह मदत दिली जाते. ही रक्कम वाढवून ती पंचवीस हजार करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर यांनी केली. ती पंधरा हजार रुपये करण्यात आली. राज्य शासनाने चंद्रपूरला नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भत्तापासून मुकावे लागणार आहे. भत्ते दिले की नाही, यावरही चर्चा करण्यात आली, अन्य विषयही चर्चेत आले. त्यापैकी काही विषयांना मंजुरी देण्यात आली, सभेला अध्यक्ष संध्या गुरुनुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सुजाता भगत, जीवतोड, करपे, अहीरकर, वारजूकर, पाझारे, मेश्राम यांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)
अधिकारी उशिराने आल्याने सदस्यांत संताप
By admin | Published: January 24, 2015 12:33 AM