चंद्रपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे यांची चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, नियोजित बैठकस्थळी विरोधकांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत विरोधकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
चंद्रपूर येथील अग्रसेन भवन, दाताळा मार्ग परिसरात संभाजी भिडे यांच्या नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ते येणार असल्याने सकाळपासूनच चंद्रपूरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बैठकस्थळीही मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान, भिडे यांच्या चंद्रपूर जिल्हा प्रवेश व बैठकीला उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यांची बैठक उधळून लावण्याचाही काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.
बैठक परिसरात शेकडो विरोधी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी केली. विरोधी कार्यकर्त्यांनी बैठकस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना जोरदार नारेबाजी झाली. दरम्यान, पोलिसांनी नारेबाजी करणाऱ्या उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बैठक पार पडली.