घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मग त्या कैऱ्या असोत की परिपक्व. पिकलेले आंबे तर प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आंबे हवेहवेसे वाटत असले तरी झाड लावण्याची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडांची लागवड करून त्याला व्यावसायिक पद्धतीने संगोपण केले. त्यामुळे गावरान आंब्यांचे गाव म्हणून डोगरगावची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.सध्या तप्त उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाहीलाही होत असताना गावरान आंबा चाखल्यास मोठा आनंद मिळतो. डोंगरगाव हे गाव शहरापासून पाच किमी अंतरावर आहे. गावातील सर्वच नागरिक शेती करतात. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. धानासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षात डोंगरगाव हे दर्जेदार गावरान आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोडे व अजय हिरामन कोसे आदींनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. याशिवाय गावरान आंब्यांची झाडेही शेतात आहेत. या शेतकºयांकडे सुमारे १५० झाडे असल्याची माहिती पुढे आली. उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की, बाजारात केव्हा येतात, याची प्रतीक्षा शहरातील नागरिकांना लागून असते.आंबा पाडाला आल्यानंतर आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील, याची सूचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात खपत असतात. बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात. शेतकºयांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नगदी पिकांचा स्वीकार केला. यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे.
डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:40 AM
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.
ठळक मुद्देगावरान आंब्यांची मागणी वाढली : आंब्यांसाठी यंदा पोषक हवामान