चंद्रपूर : भागात उत्पादित होणारा हातसडीच्या तांदुळ तसेच ग्रामीण भागात स्थानिकांडून निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तुंना राज्याच्या अनेक शहरी भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उत्पादनांना ऑनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ मिळाली तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. कृषी विभागाने या बाबी लक्षात घेवून भाजीपाला व फळे यासह ग्रामीण भागातील इतर उत्पादनांच्या रेडिमेट पॅकीग व ऑनलाईन मार्केटिंगवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी व्यक्त केले.
प्रधान सचिव अनुप कुमार यांनी काल चंद्रपूर येथील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बारहते, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजपुत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. एन. सोमनाथे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी जांभुळे उपस्थित होते.
प्रधान सचिव अनुप कुमार यांनी कमी खर्चात व कमी वेळेत जास्त लाभ देणारी शेवगा, मका इ. पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याबाबत, किसान क्रेडिट कार्ड वितरणात प्रगती करण्याबाबत तसेच जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला फार मोठा वाव असून मत्स्यउत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.