सावरगाव : नागभीड तालुक्यातील किटाळी (बोर.)येथील ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल भरण्याबाबत विचारणा करायला गेलेल्या तळोधी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना तब्बल दीड तास सरपंचांने ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश कानूजी सैजारे यांनी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केल्यानंतर सरपंच छगनलाल देवराव कोलते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तळोधी सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश सैजारे हे त्यांचे दोन सहकारी गौरव गिरीधर गौरकार, दिलीप किसन गेडाम यांच्या सोबत जनकापूर, चिंधीचक, चिंधी माल, किटाळी (बोर) या गावांत वीज बिल वसुली, दुरुस्ती, व विजेची देखभाल करतात. दरम्यान तळोधी येथील सहायक अभियंता मंगेश येनूरकर यांच्या आदेशानुसार किटाळी (बोर )येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता पाणी पुरवठा योजनेचा वीज बिल भरले काय, याबाबत सरपंच छगनलाल कोलते यांना विचारले. कालांतराने उपस्थित ग्रामविकास अधिकारी निघून गेले. दरम्यान, सरपंचानी वीज बिल भरना केला नसल्यामुळे सैजारे यांनी वीज पुरवठा खंडित करण्याबाबत सांगितले. त्यांनी अरेरावी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला व ग्रामपंचायतच्या कार्यालयातच बाहेरून कुलूप ठोकून तिघांनाही डांबले. त्यांनी सहायक अभियंता मनोज येनुरकर यांना संपर्क केला असता ते पोलिसांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तब्बल दीड तासांनी त्या तिन्ही कर्मचाऱ्यांना सरपंचांनी सोडले. दरम्यान शासकीय कामात अडथळा व खोलीत डांबून ठेवण्या प्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश सैजारे यांनी नागभीड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली असता सरपंच छगनलाल कोलते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..