शंकरपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाअंतर्गत रोजगार सेवक काम करीत असून या रोजगार सेवकांना मानधन व विमा कवच नाही. कोरोना काळात त्यांच्या जीवितास काही झाल्यास त्यांच्या कुटुंबावर मात्र उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे रोजगार सेवकांना विमा कवच व मानधन देण्यात यावे, अशी मागणी आहे.
महाराष्ट्र राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सेवक काम करीत असतात. या रोजगार सेवकांना प्रत्यक्षात कामावर जाऊन हजेरी घेणे, कामाची एमबी बनविणे, ते पंचायत समितीला नेऊन देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे आदी कार्य करावे लागते. मागील वर्षीपासून कोरोनाच्या काळातील हे रोजगार सेवक तत्परतेने काम करीत आहेत. मजूर वर्गांना वेळेवर मजुरी मिळावी यासाठी ते धावपळीत करीत असतात, पण या रोजगार सेवकांना शासनाकडून कामाच्या अंदाजपत्रकानुसार कमिशन मिळत असते. त्या कमिशनच्या भरवशावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. चिमूर तालुक्यात रोहयोचे काम करीत असताना भिसी येथील विश्वास बनसोड, सिरपूर येथील शंकर वाघ, मेटेपार येथील घनश्याम सामुसाकडे व चिचाळा शास्त्री येथील विनायक वासनिक यांचे कोरोना आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडलेले आहे. या रोजगारांना शासनाकडून कोणतेही मानधन किंवा विमा कवच नसल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाने या सर्व रोजगार सेवकांचा विमा काढावा व मासिक मानधन मिळावे तसेच कोरोना काळात ज्या रोजगार सेवकांचा मृत्यू झालाय, त्या रोजगार सेवकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष देविदास दैवले, प्रफुल राजूरकर, पृथ्वीराज डांगे, महादेव गजघाटे, भागो खेडकर, अरुण चौधरी आदींनी केली आहे.